Tuesday, 14 January 2025

PCOD… एक अपूर्ण प्रकल्प

 PCOD… एक अपूर्ण प्रकल्प

स्त्रीची प्रजनन संस्था ही खूप गुंतागुंतीने काम करणारी व्यवस्था आहे. याला एका मल्टिनॅशनल कंपनीशी तुलना करता येईल, जिथे प्रत्येक विभाग आपापले कार्य सुरळीत पार पाडतो.

या कंपनीचा बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणजे मेंदूचा हायपोथॅलॅमस विभाग. हा विभाग आपल्या सीईओ म्हणजेच पिट्युटरी ग्रंथीच्या माध्यमातून ओव्हरी या कार्यालयाचे काम चालवतो.




पिट्युटरी ग्रंथी दर महिन्याला ओव्हरीला एक ओव्हम तयार करण्याचे आदेश देते. महिन्याच्या सुरुवातीला एफएसएच (FSH) या प्रोजेक्ट मॅनेजरला ओव्हरी ऑफिसमध्ये पाठवले जाते.

ओव्हरीतील प्रक्रिया


ओव्हरीमध्ये असणारी हजारो ओसाइट्स (Oocytes) म्हणजे या कंपनीचे इंटर्न्स, काम शिकण्यासाठी प्रयत्न करतात. एफएसएच या मॅनेजरच्या मदतीने यापैकी 20 ओसाइट्स विकसित होतात. त्यातला एक ओसाइट योग्य प्रशिक्षण घेऊन एलएच (LH) या दुसऱ्या प्रोजेक्ट मॅनेजरच्या मार्गदर्शनाखाली ओव्हम म्हणून ओव्हरीतून बाहेर येतो.
यानंतर ओव्हम गर्भाशयात जाऊन पुरुष बीजाची (स्पर्म) वाट पाहतो. जर बीजाशी यशस्वी संयोग झाला तर गर्भधारणा होते; अन्यथा महिन्याच्या शेवटी ओव्हम शरीरातून बाहेर टाकला जातो.

PCOD कसे होते?



सध्याच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे, जसे की वजन वाढणे, चुकीच्या आहारपद्धती, मानसिक ताण आणि व्यायामाचा अभाव, प्रजनन संस्थेचा हा प्रकल्प वारंवार फसतो. परिणामी, ओव्हम ओव्हरीच्या बाहेर पडत नाही. महिनेच्या महिन्यांपर्यंत ओव्हम ओव्हरीमध्येच अडकून राहतो आणि ओव्हरी द्राक्षाच्या घडासारखी दिसू लागते. यालाच PCOD (Polycystic Ovarian Disease) असे म्हणतात.


PCOD ची लक्षणे



1. मासिक पाळी अनियमित किंवा कमी होणे.

2. चेहऱ्यावर अनावश्यक लव वाढणे.

3. केस गळणे.

4. पिंपल्स वाढणे.

5. वजन वाढणे.

6. वंध्यत्वाचा त्रास.

PCOD होण्याची कारणे



· अधिक बैठे काम व व्यायामाचा अभाव.

        · अति स्निग्ध व गुरू पदार्थांचा (पिझ्झा, बटर, पनीर, लस्सी, मांसाहार) अतिवापर.

· लवकर वयात कामोत्तेजक गोष्टींचा अति संपर्क (स्पर्श, दृश्य किंवा श्राव्य माध्यमातून).

· पाळी पुढे-मागे करण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या हार्मोनल गोळ्या.

· अति रुक्ष आहार, जसे की डाएटच्या नावाखाली उपाशी राहणे.

· मानसिक ताण आणि चिंता.

या सर्व कारणांमुळे मेंदूतील हार्मोन्सचे संतुलन बिघडते, ज्याचा परिणाम दर महिन्याला ओव्हरीतून बाहेर पडणाऱ्या ओव्हमवर होतो. हा अडथळा सातत्याने होत राहिल्यास PCOD निर्माण होतो.


आयुर्वेदाद्वारे PCOD उपचार

PCOD हा आयुर्वेदाने पूर्णपणे बरा होणारा विकार आहे. परंतु, यासाठी खालील उपचारांची अंमलबजावणी आवश्यक आहे:

1. पंचकर्म:

वमन  बस्ती अशा पंचकर्म प्रक्रियेद्वारे शरीरशुद्धी केली जाते.

यानंतर औषधोपचार करून PCOD पूर्णपणे बरा केला जातो.

2. आहार:

रुग्णाला योग्य आहारसंबंधी मार्गदर्शन केले जाते. काही विशिष्ट पदार्थांचा योग्य वापर करण्यास सांगितले जाते.

3. योगासने:

पवनमुक्तासन, शलभासन, अर्धमत्स्येंद्रासन, चक्कीचालनासन, तितलीआसन, पश्चिमोत्तानासन यांसारखी आसने नियमित केल्यास PCOD पुन्हा होण्याची शक्यता कमी होते.


निष्कर्ष

PCOD झालेल्या स्त्रियांच्या ओव्हम ट्रेनिंगचा प्रकल्प आयुर्वेदाने सुरळीत पार पाडता येतो. परंतु, यासाठी नियमित पथ्य, पंचकर्म आणि औषधोपचार यांचे पालन करणे गरजेचे आहे. आयुर्वेदातील योग्य उपचार पद्धतीने PCOD पूर्णपणे बरा करता येतो आणि महिलांचे प्रजनन आरोग्य सुधारता येते.



 डॉ. भूषण काळे                                                                                 डॉ .स्मिता काळे 

  एम एस (प्रसूती व स्त्री रोग )                                                                  एम डी (पंचकर्म ) केरळ

                       आयुभूषण आयुर्वेदिक वंध्यत्व निवारण आणि केरळीय पंचकर्म चिकित्सालय

                             (वंध्यत्व, स्त्रीरोग, गर्भसंस्कार, सुवर्णप्राशन, केरळीय पंचकर्म)

                                                       9665351355 / 8888511522



No comments:

Post a Comment