Wednesday, 12 March 2025

पंचकर्माची ओळख - भाग 13: स्वेदन चिकित्सा

 पंचकर्माची ओळख - भाग 13: स्वेदन चिकित्सा

पंचकर्माची माहिती घेण्यापूर्वी, आपण पूर्वकर्मामध्ये स्नेहनानंतर केले जाणारे स्वेदन पहिले होते. आता स्वेदन हे स्वतंत्र चिकित्सा म्हणून कसे वापरले जाते, ते पाहू.

स्वेदनाचे जवळजवळ तेरा ते पंधरा प्रकार आयुर्वेदात वर्णित आहेत. स्वेदन म्हणजे शरीरावर घाम किंवा स्वेद निर्माण करणारी प्रक्रिया. सामान्यपणे स्नेहनानंतर स्वेदन केले जाते. त्याद्वारे शरीराच्या विविध अवयवांमध्ये उष्णता वाढवली जाते, ज्यामुळे स्वेदग्रंथी उत्तेजित होतात आणि शरीरातील विषद्रव्ये बाहेर पडतात.

स्वेदनाचे फायदे: स्वेदनामुळे शरीराच्या अवयवांना उष्णता मिळून, तेथील स्वेदग्रंथी कार्यरत होतात. त्यामुळे शरीरातील विषद्रव्ये बाहेर पडतात आणि शरीरातील जडपणा, वेदना, सूज कमी होतात. आमवात, संधिवात, श्वास विकार, स्थौल्य यांसारख्या विकारांमध्ये स्वेदनाचा उपयोग केला जातो.

स्वेदनासाठी वापरली जाणारी औषधे उष्ण आणि तीव्र गुणांची असतात. कफाचे विकार आणि कफप्रधान विकारांमध्ये रुक्ष स्वेदन, तर वातप्रधान विकारांमध्ये स्निग्ध स्वेदन वापरले जाते.

स्वेदनाचे प्रकार:

1. एकांग स्वेद एखाद्या अवयवावर मर्यादित स्वेद देणे. उदाहरणार्थ, कंबरदुखी मध्ये कमरेला स्वेद देणे.

2. सर्वांग स्वेद पूर्ण शरीरावर वाफेने स्वेद देणे. हे पंचकर्माच्या पूर्वकर्मामध्ये दिले जाते.

3. रुक्ष स्वेद वाळू, मीठ, वीट अशा कोरड्या पदार्थांचा वापर करून स्वेदन करणे. आमवात आणि सूज यामध्ये रुक्ष स्वेदन उपयुक्त असतो.

4. स्निग्ध स्वेद तेल किंवा तेलाच्या काढ्याचा वापर करून स्वेदन करणे. उदाहरणार्थ, कटिबस्तीत गरम तेलाने स्वेदन.

स्वेदनाचे विविध प्रकार:

1. नाडी स्वेद शरीराच्या विशिष्ट अवयवावर स्वेदन देणे. यामध्ये औषधांचा काढा प्रेशर कुकरमध्ये भरून वाफ देऊन स्वेदन केले जाते.

2. सर्वांग बाष्पस्वेद पेटीमध्ये झोपवून शरीराच्या सर्व भागांना औषधीय वाफ देणे.

3. अवगाह स्वेद गरम औषधी काढा, तेल, दूध यामध्ये शरीराचा अवयव बुडवून स्वेदन दिले जाते.

4. कायसेक विशेषत: केरळीय पंचकर्मात वापरली जाणारी पद्धत. त्यात स्नेह द्रव्याचे शेक सर्व शरीरावर केले जाते.

5. पिण्डस्वेद औषधी द्रव्यांनी भरलेली पोटली (पिण्ड) शरीरावर शेकवली जाते.

स्वेदनाचे फायदे:

· वातव्याधी, पक्षाघात, सायटिका, मणक्याचे विकार, फेशियल पॅरालिसिस यामध्ये स्वेदन प्रभावी ठरते.

· पिण्डस्वेदनामुळे वातव्याधींमध्ये, विशेषतः पोलिओ, मस्क्युलर डिस्ट्रॉफी आणि रक्तदुष्टीसारख्या विकारांमध्ये उपयुक्तता असते.

आयुर्वेदाचा दृष्टिकोन: आयुर्वेदानुसार, स्वेदन हे एक महत्त्वाचे पंचकर्म आहे, जे शरीरातील दोषांचा नाश करणे, रक्तप्रवाह सुधारणा आणि अंगातील विकार दूर करणे यासाठी वापरले जाते. स्वेदनाची चिकित्सा मात्र वैद्याच्या मार्गदर्शनाखालीच केली पाहिजे, कारण प्रत्येक रुग्णाच्या प्रकृतीनुसार त्याच्या शरीरासाठी योग्य प्रकार निश्चित करणे आवश्यक आहे.


No comments:

Post a Comment