Friday, 14 February 2025

।।ओळख आयुर्वेदोक्त पंचकर्माची।। भाग 1

 ।।ओळख आयुर्वेदोक्त पंचकर्माची।। भाग 1

आजकाल कोणालाही आयुर्वेदात स्वतःला मास्टर समजून बुवाबाजी करण्याची लहर आली आहे.
कधी पेपरातल्या कात्रणांवरून, तर कधी यूट्यूबवरचे व्हिडीओ पाहून काहीजण निसर्गोपचार, मालिश किंवा गोमूत्राचे सहा महिन्यांचे कोर्स करून गावभर आयुर्वेदाचा गवगवा करत फिरतात.

त्यांचं म्हणणं असं की, "आम्ही आयुर्वेदाचा गाभा समजून घेतलाय." त्यात सोशल मीडियाने आगाऊ भूमिका घेतली आहे.
ढीगभर ग्रुप्समध्ये काहीही चर्चा चालू असते.
कुणी म्हणतं, "ताकावर पंचकर्म होतो," तर कुणी सांगतं, "पाच दिवसांत पाच पंचकर्म."

एक पठ्ठ्या तर वेगवेगळ्या जेल्या घेऊन आला होता, म्हणतो, "ह्या खाल्ल्या की पंचकर्म होतं. भसकन सगळं शरीरातलं घाण बाहेर पडतंय. रशियन टेक्नॉलॉजी आहे म्हणे!"
त्याला आयुर्वेदाचा खरीखुरा अर्थ समजवावा लागला... जरा ज्यास्तच प्रेमानं!
तेव्हा कुठे त्याला शहाणपण आलं.

आयुर्वेद आणि पंचकर्माचा गाभा समजून घेणं का गरजेचं आहे?

आयुर्वेद आणि पंचकर्म हे केवळ ब्रँड शब्द बनले आहेत, आणि त्यांचा बाजार मांडला जातोय.
त्यामुळेच सामान्य लोकांनी खऱ्या आयुर्वेदाची आणि पंचकर्माची ओळख करून घेणं अत्यंत आवश्यक आहे.
या लेखातून पंचकर्म म्हणजे काय, हे सोप्या भाषेत समजावण्याचा प्रयत्न आहे.


आयुर्वेदातील उपचार पद्धती

आयुर्वेदात मुख्यतः दोन प्रकारे उपचार केले जातात:

1. शमन:
आजार निर्माण करणारे वाढलेले किंवा बिघडलेले दोष जागच्या जागी शांत करणे, म्हणजेच त्यांना सामान्य (प्राकृत) अवस्थेत आणणे.

2. शोधन:
दोषांचा मुळातून नायनाट करण्याची प्रक्रिया. वाढलेले किंवा बिघडलेले दोष शरीराबाहेर टाकून नंतर संसर्जन क्रम व रसायन उपचारांनी शरीर शुद्ध स्वरूपात कार्यक्षम बनवणे.


पंचकर्म म्हणजे काय?

पंचकर्म म्हणजे आयुर्वेदातील एक विशेष प्रक्रिया, जी कोणत्याही प्रकारची चिरफाड न करता शरीरातील दुषित दोष शरीराबाहेर काढते.

उदाहरणार्थ,

· शमन म्हणजे घराच्या बाहेर वरवर दिसणारा कचरा काढून टाकणं आणि घर नीट सावरणं.

· शोधन म्हणजे दसरा-दिवाळीला घराचा कानाकोपरा स्वच्छ करणं, बिघडलेली दुरुस्ती करणं, आणि पेंट करून घराला नवीन रूप देणं.


पंचकर्माचे महत्त्व

पंचकर्म ही एक गंभीर प्रक्रिया आहे. यात पथ्यापथ्याचं पालन अत्यंत महत्त्वाचं असतं.
मज्जा-मज्जात पंचकर्म केलं म्हणून काही होत नाही.
तुमच्या प्रकृतीनुसार वर्षातून एकदा पंचकर्म आणि योग्य आहार-विहार यामुळे:

· तारुण्य टिकून राहतं.

· जीवनशैलीतील बदलांमुळे होणाऱ्या अनेक आजारांना प्रतिबंध होतो.

आयुर्वेदातील पंचकर्म ही केवळ चिकित्सा नसून ती जीवनशैली सुधारण्याचं साधन आहे.
(क्रमशः)

  #बांझपन #आयुर्वेदिकउपचार #महिला_स्वास्थ्य #प्रजनन #PCOS #PCOD #स्वस्थ_जीवनशैली

  (अधिक माहितीसाठी व उपचारासाठी डॉक्टरांशी संपर्क करा.)





 डॉ. भूषण काळे                                                                                 डॉ .स्मिता काळे 

  एम एस (प्रसूती व स्त्री रोग )                                                                  एम डी (पंचकर्म ) केरळ

                       आयुभूषण आयुर्वेदिक वंध्यत्व निवारण आणि केरळीय पंचकर्म चिकित्सालय

                             (वंध्यत्व, स्त्रीरोग, गर्भसंस्कार, सुवर्णप्राशन, केरळीय पंचकर्म)

                                                       9665351355 / 8888511522

No comments:

Post a Comment