ओळख पंचकर्माची
भाग 2
पंचकर्म म्हणजे पंच म्हणजे पाच आणि कर्म म्हणजे क्रिया. येथे 'क्रिया' या शब्दाचा अर्थ शुद्धीकरण प्रक्रियेशी संबंधित आहे. आयुर्वेदात पंचकर्माला 'शोधन' असेही संबोधले जाते. शोधन म्हणजे शरीरातील बिघडलेल्या दोषांना शोधून, त्यांचा नाश करून बाहेर काढणे.
पंचकर्माच्या प्रक्रियेत पाच मुख्य उपचारांचा समावेश आहे – वमन, विरेचन, बस्ती, नस्य, आणि रक्तमोक्षण.
या उपचारांद्वारे शरीरात वाढलेले किंवा बिघडलेले दोष जवळच्या मार्गाने बाहेर काढले जातात, ज्यामुळे शरीराला संतुलन आणि निरोगीपणा प्राप्त होतो.
वमन (औषधाने उलटी करून शुद्धीकरण)
वमनाचा उपयोग बिघडलेले कफ व पित्त दोष बाहेर काढण्यासाठी होतो.
· वापर: दमा, आम्लपित्त, अॅलर्जी, त्वचारोग, स्थूलता यांसारख्या विकारांमध्ये वमन चिकित्सा उपयुक्त ठरते.
· ऋतूनुसार उपयुक्तता: वसंत ऋतूत नैसर्गिकरित्या वाढलेल्या कफ दोषाला संतुलित करण्यासाठी निरोगी व्यक्तींना देखील वमन चिकित्सा दिली जाते.
विरेचन (जुलाबाने शुद्धीकरण)
विरेचन प्रक्रियेत गुदमार्गाद्वारे पित्त दोष बाहेर टाकले जातात.
· वापर: आम्लपित्त, कावीळ, त्वचारोग, नागीण, गळवे, दाह, जलोदर, दमा, आमवात इत्यादी विकारांमध्ये विरेचन उपयोगी आहे.
· ऋतूनुसार उपयुक्तता: शरद ऋतूत वाढलेल्या पित्त दोषाला संतुलित करण्यासाठी निरोगी व्यक्तींनाही विरेचन दिले जाते.
बस्ती (औषधांचा एनीमा देऊन वातशुद्धी)
बस्ती ही वातदोषावर केंद्रित प्रक्रिया असून ती पंचकर्मांमध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
· वापर: सांधेदुखी, कंबरदुखी, पक्षाघात, अपस्मार यांसारख्या वातविकारांमध्ये बस्ती उपयुक्त आहे.
· ऋतूनुसार उपयुक्तता: वर्षा ऋतूत वाढलेल्या वातदोषाला संतुलित करण्यासाठी बस्तीचा उपयोग होतो.
नस्य (नाकाद्वारे औषधाचा उपयोग)
नाकात औषध टाकून गळ्याच्या वरच्या भागातील दोष काढून टाकण्याच्या प्रक्रियेस नस्य म्हणतात.
· वापर: सर्दी, डोकेदुखी, केसगळती, मानदुखी, निद्रानाश, हार्मोनल विकारांमध्ये नस्य प्रभावी ठरते.
रक्तमोक्षण (रक्त शुद्धीकरण)
रक्तातील दोष शिरेतून किंवा जळवांच्या साहाय्याने बाहेर काढले जातात.
· वापर: त्वचारोग, नागीण, डोकेदुखी, उच्च रक्तदाब आणि काही कॅन्सर विकारांमध्ये रक्तमोक्षणाची चिकित्सा उपयुक्त असते.
पंचकर्माची गरज का?
आपल्या शरीरातून नैसर्गिकरित्या मल, मूत्र, घाम, शिंक, खोकला, ढेकर यांसारख्या क्रियेद्वारे अशुद्धी बाहेर पडत असते. तरीदेखील दीर्घकाळ चुकीचा आहार-विहार, ऋतुबदल किंवा वाढत्या वयामुळे शरीरात सूक्ष्म पातळीवर दोष साठतात. हे दोष साध्या पद्धतीने बाहेर काढता येत नाहीत. पंचकर्माच्या प्रक्रियेत हे दोष शरीराच्या खोलवर पोकळीतून मोकळे करून काढले जातात.
पूर्वकर्म आणि नियमांचे महत्त्व
पंचकर्म करण्यापूर्वी काही विशिष्ट प्रक्रियांचे पालन करावे लागते. यामध्ये स्नेहन (तेल लावणे) आणि स्वेदन (उष्णतायुक्त वाफ देणे) यांचा समावेश आहे. यामुळे दोषांना पातळ करून बाहेर काढण्यास सोपे जाते.
पुढील भागात आपण पंचकर्मासाठी आवश्यक असलेल्या पूर्वकर्मांची सविस्तर माहिती पाहू.
(अधिक माहितीसाठी व उपचारासाठी डॉक्टरांशी संपर्क करा.)
डॉ. भूषण काळे डॉ .स्मिता काळे
एम एस (प्रसूती व स्त्री रोग ) एम डी (पंचकर्म ) केरळ
आयुभूषण आयुर्वेदिक वंध्यत्व निवारण आणि केरळीय पंचकर्म चिकित्सालय
(वंध्यत्व, स्त्रीरोग, गर्भसंस्कार, सुवर्णप्राशन, केरळीय पंचकर्म)
No comments:
Post a Comment