Thursday, 20 February 2025

 ओळख पंचकर्माची

भाग 3 – स्नेहन आणि त्याचे महत्व

मध्यंतरी माझ्याकडे एका कंबरदुखीच्या रुग्णाने पंचकर्म करण्याची विचारणा केली. त्याला बस्ती या पंचकर्माची गरज आहे असे सांगितले असता, तो म्हणाला, "मी तर गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये दहा पंचकर्म केली आहेत." हे ऐकून मी चक्रावले, कारण संपूर्ण पंचकर्म उपचारासाठी 57-58 दिवस लागतात. मग एका महिन्यात दहा पंचकर्म कशी शक्य आहेत? यावर रुग्णाशी संवाद साधल्यावर कळाले की, केवळ स्नेहन-स्वेदन उपचारालाच तो पंचकर्म समजत होता.

अशा गोंधळातून अनेकदा रुग्णांची फसवणूक होते. त्यामुळे पंचकर्माची खरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे आणि योग्य उपचाराचा लाभ मिळवून देणे अत्यंत गरजेचे आहे.


पूर्वकर्म पंचकर्मासाठी पहिला टप्पा

पंचकर्म करण्यापूर्वी काही पूर्वकर्मांची आवश्यकता असते. विशेषतः वमन आणि विरेचन या चिकित्सा करण्यापूर्वी पूर्वकर्म निकडीचे असते.

पूर्वकर्म दोन प्रकारचे असतात:

1. स्नेहन

2. स्वेदन

आज आपण स्नेहन विषयी माहिती घेऊया.


स्नेहन म्हणजे काय?

स्नेहन म्हणजे शरीरात स्नेह (तूप/तेल) प्रवाहित करणे. याचा उद्देश शरीरातील दोषांना (वात, पित्त, कफ) सैल करून योग्य मार्गाने बाहेर काढणे हा असतो. स्नेहन हे दोन प्रकारचे असते:

1. अभ्यंतर स्नेहन (आंतर सेवन)

2. बाह्य स्नेहन (बाहेरून तेल लावणे)


1. अभ्यंतर स्नेहन

अभ्यंतर स्नेहन म्हणजे पोटामध्ये तूप किंवा तेलाचा समावेश करणे.
महत्व:

· शरीरातील पेशींमध्ये साठलेले दोष सैल होऊन शरीराच्या निःसारण मार्गांजवळ येतात.

· स्निग्ध पदार्थामुळे शरीरातील दोष सहजपणे बाहेर पडतात.

कसे केले जाते?

· अभ्यंतर स्नेहनासाठी विशेष औषधी तूप किंवा तेल वापरले जाते, जसे महातिक्ष्ण घृत किंवा पंचतिक्त घृत.

· वैद्यांच्या सल्ल्यानुसार तीन, पाच किंवा सात दिवस क्रमाक्रमाने प्रमाण वाढवून स्नेहपान दिले जाते.

· स्नेहन पूर्ण झाल्याची काही लक्षणे असतात, जसे की त्वचेमध्ये स्निग्धता जाणवणे, मलावरोध कमी होणे, आणि शरीर हलके वाटणे.

स्नेहपान कधी वापरले जाते?

· किडनी स्टोन: वेदना कमी करण्यासाठी.

· त्वचारोग: रोगमुक्तीकरिता.

· कृशता: शरीर पुष्ट करण्यासाठी.


2. बाह्य स्नेहन

बाह्य स्नेहन म्हणजे शरीरावर बाहेरून तेलाचा अभ्यंग (मालिश) करणे.

महत्व:

· दोषांना सैल करण्यासाठी.

· शरीरातील उष्णता वाढवून स्वेद (घाम) निर्माण करण्यासाठी.

कसे केले जाते?

· विशेष औषधी तेलांचा वापर केला जातो, जसे दशमूल तेल, मूर्वादि तेल.

· मालिश खालून वरच्या दिशेने केली जाते.

· अभ्यंगानंतर स्वेदन (शरीराला वाफ देणे) केले जाते, ज्यामुळे दोष बाहेर पडण्यासाठी तयार होतात.

उपयोग:

· संधिवात, कंबरदुखी, मानदुखी यांसारख्या वातविकारांवर उपचार.

· त्वचेची लवचिकता सुधारण्यासाठी.

· मानसिक ताण कमी करण्यासाठी.


स्नेहनाच्या विविध प्रकारांतील उपयुक्तता

शरीरातील विविध मार्गांवर (नाक, कान, डोळे, मुख, गुद, योनिमार्ग) स्नेहनाचा वापर केला जातो. यातील काही उपचार पुढीलप्रमाणे:

· नस्य: नाकाद्वारे स्नेहन.

· कर्णपूरण: कानात तेल टाकणे.

· नेत्रतर्पण: डोळ्यांसाठी तुपाचा उपयोग.

· गंडूष: तोंडात स्नेह धरून ठेवणे.

· शिरोधारा: डोक्यावर तेल धारधारा करणे.

· बस्ती: गुदमार्गातून औषधीय तेल देणे.


स्नेहनाचा अर्थ पूर्ण आरोग्य साधणे

स्नेहन ही पंचकर्मातील पूर्वकर्म असली तरी त्याचा उपयोग स्वतंत्र उपचार म्हणूनही केला जातो. योग्य पद्धतीने केलेले स्नेहन शरीराची सर्वांत खोलवर स्वच्छता करते आणि पुढील पंचकर्मासाठी शरीर तयार करते.

पुढील लेखात आपण स्वेदन व इतर पूर्वकर्मांविषयी माहिती घेऊ.


तुमच्या आरोग्यासाठी पंचकर्म हाच सर्वोत्तम उपाय आहे. तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घेऊन योग्य उपचार निवडा.






 डॉ. भूषण काळे                                                                                 डॉ .स्मिता काळे 

  एम एस (प्रसूती व स्त्री रोग )                                                                  एम डी (पंचकर्म ) केरळ

                       आयुभूषण आयुर्वेदिक वंध्यत्व निवारण आणि केरळीय पंचकर्म चिकित्सालय

                             (वंध्यत्व, स्त्रीरोग, गर्भसंस्कार, सुवर्णप्राशन, केरळीय पंचकर्म)

                                                       9665351355 / 8888511522

 

No comments:

Post a Comment