Monday, 24 February 2025

ओळख पंचकर्माची - भाग ६

ओळख पंचकर्माची - भाग ६

आपल्या लहानपणी बर्याच घरांमध्ये दोन-तीन महिन्यांतून एकदा घरातील सर्वांनाच एरंडेल पाजण्याचा एक ठरलेला कार्यक्रम असायचा. त्यावेळी हे त्रासदायक वाटायचं, पण आयुर्वेद शिकल्यावर लक्षात आलं की पोटाची शुद्धी आणि शरीराच्या संतुलनासाठी ही पद्धत किती उपयुक्त होती! आज मात्र आपण पोटाला विश्रांती देण्याऐवजी सतत काही ना काही खात राहतो, ज्यामुळे पचनसंस्था थकते आणि बिघडते.

आयुर्वेदातील पंचकर्मांपैकी विरेचन हे दुसरे शोधन कर्म आहे.
हे पित्तदोष आणि मलशुद्धीसाठी वापरले जाणारे महत्त्वाचे उपचार आहे. यामध्ये शरीरातील दोषांना खालच्या मार्गाने (मलप्रवृत्ती) बाहेर काढले जाते.

 

विरेचन उपचार कधी आणि कशासाठी करायचे?

विरेचन मुख्यत्वे खालील विकारांमध्ये उपयुक्त ठरते:

· पित्तप्रधान विकार: आम्लपित्त, डोकेदुखी, त्वचेवर दाह.

· पचनसंस्थेचे विकार: बद्धकोष्ठता, गॅसेस, अपचन.

· रक्तदोषजन्य विकार: कावीळ, नागीण, गळवे, तारुण्यपीटीका.

· त्वचाविकार: सोरायसिस, इसब, कोड, वांग.

· जलसंचयजन्य विकार: सूज, जलोदर.

· इतर विकार: दमा, मानसिक विकार, पाळीचे विकार, शुक्रदोष.

विरेचन करण्यासाठीची तयारी (पूर्वकर्म):

विरेचन उपचार सुरक्षित आणि प्रभावी होण्यासाठी रुग्णाची पूर्वतयारी करणे आवश्यक आहे. यामध्ये:

1. स्नेहपान: तूप किंवा औषधी घृत पिणे, ज्यामुळे दोष सैलसर होतात.

2. अभ्यंग: संपूर्ण शरीराला औषधी तेलाने मालिश करणे.

3. स्वेदन: शरीराला स्टीम देऊन घाम आणणे, ज्यामुळे दोष त्वचेखालून सुटून आतल्या मार्गाने जातात.

हे पूर्वकर्म तीन ते सात दिवस केले जाते. यानंतर एका दिवसाची विश्रांती दिली जाते आणि रुग्णाला पित्तदोष वाढवणारा पातळ, उष्ण आणि स्निग्ध आहार (उदा. कढण, मूगपाणी) दिला जातो.

विरेचनाच्या दिवशी:

· सकाळी लवकर रुग्णाला स्नान इत्यादी करून तयारीस सांगितले जाते.

· इष्ट देवतेचे स्मरण करून विरेचनाचे औषध दिले जाते.

· साधारण 1-2 तासांत मल, पित्त, कफ आणि शेवटी वायू बाहेर पडतो.

विरेचनानंतरची काळजी (पश्चात कर्म):

1. आहार नियोजन:

प्रथम दिवशी पेज, मूगाचे पाणी.

पुढील दिवसांमध्ये क्रमाक्रमाने पातळ भात, खिचडी, मग हलका आहार सुरू करणे.

नेहमीच्या आहारावर आणताना वैद्यांच्या सल्ल्यानेच आहार ठरवावा.

2. विश्रांती आणि पथ्य:

पूर्ण विश्रांती घ्यावी; परंतु दिवसा झोपणे टाळावे.

आहार-विहार आणि जीवनशैलीतील पथ्ये काटेकोरपणे पाळावीत.

 

विरेचनाचे फायदे:

विरेचनामुळे शरीरातून दोष सहजगत्या बाहेर पडतात, ज्यामुळे:

· पचन सुधारते.

· त्वचा चमकदार होते.

· शरीर हलके वाटते.

· मन शांत राहते.

विरेचन ही प्रक्रिया वैद्यांच्या देखरेखीखाली आणि योग्य मार्गदर्शनाखाली केल्यास अत्यंत सुरक्षित आणि फायदेशीर असते.

 

पुढील भागात आपण पंचकर्मातील तिसऱ्या आणि महत्त्वाच्या उपचारपद्धतीबद्दल जाणून घेऊ - बस्ति.
बस्तिला आयुर्वेद शास्त्राने "संपूर्ण चिकित्सा" मानले आहे. पुढील आठवड्यात भेटूया!

(इलाज के लिए डॉक्टर से परामर्श करें।)





 डॉ. भूषण काळे                                                                                 डॉ .स्मिता काळे 

  एम एस (प्रसूती व स्त्री रोग )                                                                  एम डी (पंचकर्म ) केरळ

                       आयुभूषण आयुर्वेदिक वंध्यत्व निवारण आणि केरळीय पंचकर्म चिकित्सालय

                             (वंध्यत्व, स्त्रीरोग, गर्भसंस्कार, सुवर्णप्राशन, केरळीय पंचकर्म)

                                                       9665351355 / 8888511522

No comments:

Post a Comment