पंचकर्मातील बाह्य स्नेहन – आयुर्वेदाचा अमूल्य ठेवा
भाग ११: बाह्य स्नेहन
गेल्या १० भागांमध्ये आपण पंचकर्मातील विविध मुख्य उपचारांची, म्हणजेच वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण यांची ओळख करून घेतली. हे उपचार बिघडलेले दोष शरीराबाहेर काढून टाकण्यासाठी महत्त्वाचे असतात. मात्र, हे उपचार करण्यापूर्वी दोष मोकळे करण्यासाठी स्नेहन व स्वेदन या पूर्वकर्मांचे पालन करणे आवश्यक आहे.
आज आपण बाह्य स्नेहन या विषयावर सविस्तर चर्चा करूया.
बाह्य स्नेहनाचे महत्त्व
वात दोष त्रिदोषांमध्ये मुख्य असून तो इतर दोषांचे नियमन करतो.
वाताचे गुणधर्म म्हणजेच रुक्षता, थंडपणा, हलकेपणा आणि गतिमानता हे गुण आहेत. या दोषाचे संतुलन बिघडल्यास शरीरात वेदना, सूज, जखडणे, कंपवात किंवा पक्षाघात यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढते.
यावर उपाय म्हणून आयुर्वेदात तिळतेल अत्यंत उपयुक्त मानले गेले आहे. तिळतेलाचे स्नेहत्व, उष्णता, जडत्व आणि चिकटपणा हे गुण वातदोषाच्या विरुद्ध असल्याने ते वातदोष शांत करण्यासाठी प्रभावी ठरते.
आयुर्वेदामध्ये शरीरातील छिद्रांमधून तेल सोडण्याचे किंवा तेल लावण्याचे विविध उपचार आहेत. बाह्य स्नेहन म्हणजेच शरीरावर तेलाचा वापर करून वातशमन करणे.
बाह्य स्नेहनाचे प्रकार
1. शिरोभ्यंग (डोक्याचा मसाज):
डोक्याला मसाज केल्याने केसांचे आरोग्य सुधारते, कोंडा, रुक्षता आणि डोक्याचे दुखणे कमी होते. केसांची मुळे मजबूत होतात व त्यांची वाढ होते.
2. शिरोधारा:
डोक्यावर औषधी तेल, काढा, ताक किंवा दूध यांची अखंड धारा सोडली जाते. हे उपचार फिट्स, डिप्रेशन, निद्रानाश, केस गळणे आणि पॅरालिसीस यांसारख्या विकारांवर उपयुक्त ठरतात.
3. शिरोबस्ती:
डोक्यावर तेल भरून ठेवण्यासाठी विशिष्ट प्रकारची टोपी घालण्यात येते. हा उपाय विशेषतः पार्किन्सन्स, अर्धांगवायू आणि इतर वात विकारांवर उपयुक्त आहे.
4. नेत्रतर्पण (डोळ्यांना पोषण):
डोळ्यांच्या आजूबाजूला उडीद पिठाची पारी करून त्यामध्ये औषधी तेल किंवा तूप भरले जाते. सततच्या स्क्रीन टाईममुळे होणारे डोळ्यांचे विकार जसे की डोळे दुखणे, कोरडे होणे यावर नेत्रतर्पण अत्यंत उपयुक्त ठरते.
5. कर्णपूरण (कानात तेल):
कानाचे विकार, कमी ऐकू येणे, कान दुखणे यावर कर्णपूरण हा उपचार फायदेशीर ठरतो. मात्र, कानात पू येत असल्यास कर्णपूरण करू नये.
6. गंडूष (गुळण्या):
तोंडाच्या आरोग्यासाठी गुळण्यांचा वापर होतो. दात दुखणे, हिरड्या दुखणे, तोंड येणे किंवा घसा धरल्यास तिळतेल किंवा तुपाच्या गुळण्यांचा उपयोग होतो.
नियमित स्नेहन का करावे?
स्नेहनाचा उपयोग केवळ वात विकारांपुरता मर्यादित नाही. हे उपचार शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्यासाठी उपयुक्त आहेत.
· डोळे, कान, नाक आणि त्वचेचे आरोग्य सुधारते.
· संपूर्ण शरीराला ऊर्जा मिळते.
· सांधेदुखी आणि स्नायू विकारांमध्ये आराम मिळतो.
तज्ञ सल्ला आवश्यक
स्नेहन करताना योग्य औषधांची निवड महत्त्वाची आहे. वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच हे उपचार करावेत. यामुळे परिणामकारकता वाढते आणि शरीराला त्रास होत नाही.
पुढील भागामध्ये बाह्य स्नेहनाच्या उर्वरित उपचारांचा सविस्तर आढावा घेऊ.
आयुर्वेदाचा अंगीकार करा आणि निरोगी जीवन जगा!
डॉ. भूषण काळे डॉ .स्मिता काळे
एम एस (प्रसूती व स्त्री रोग ) एम डी (पंचकर्म ) केरळ
आयुभूषण आयुर्वेदिक वंध्यत्व निवारण आणि केरळीय पंचकर्म चिकित्सालय
(वंध्यत्व, स्त्रीरोग, गर्भसंस्कार, सुवर्णप्राशन, केरळीय पंचकर्म)
No comments:
Post a Comment